शबनम न्युज / पिंपरी
भोसरीतील गावजत्रा मैदान व सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर तात्पुरते जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांचे कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी महापालिकेच्या मोठ्या शाळा तसेच शहरातील मंगल कार्यालयांमध्ये अशी रुग्णालये तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील दररोजची कोरोना रुग्णसंख्या निश्चितच मोठी आहे. त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता या मोठ्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय नेहरूनगर येथे जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो क्लस्टरमध्ये कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन महापालिकेमार्फत भोसरी येथील गावजत्रा मैदान तसेच सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर प्रत्येकी ४०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार भोसरी गावजत्रा मैदानावरील नियोजित कोविड रुग्णालयासाठी फक्त विद्युत व्यवस्था उभारण्यास ३ कोटी ३९ लाख ७५ हजार ५७३ रुपये तसेच सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील नियोजित कोविड रुग्णालयाच्या विद्युत व्यवस्थेसाठी ३ कोटी ३९ लाख ४ हजार २६५ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. याचाच अर्थ भोसरी आणि सांगवी या दोन्ही ठिकाणच्या कोविड रुग्णालयाच्या फक्त विद्युत व्यवस्थेसाठी तब्बल ७ कोटी ७८ लाख ५९ हजार ८३८ रुपये खर्च करण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्थेवरच सुमारे ८ कोटी रुपये खर्च होणार असतील तर प्रत्यक्षात रुग्णालय उभारणे, बेड, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड, वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी तसेच अन्य सुविधांसाठी आणखी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार हे निश्चित आहे.
दोन्ही कोविड रुग्णालयांसाठी विद्युत व्यवस्था पुरवण्याची निविदा भरण्यास ४ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या कामाला स्थायी समितीची मंजुरी घेऊन ठेकेदाराला कामाचा आदेश दिला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत पुढील दोन आठवडे जाणार आहेत. त्यानंतर ठेकेदार कामाला सुरूवात करणार आहे. कामासाठी पात्र ठरणाऱ्या ठेकेदाराला ते पूर्ण करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. तसेच ठेकेदाराने पुढील ६ महिने विद्युत व्यवस्थेची देखभाल दुरूस्ती करावी, अशी अट निविदेत घालण्यात आली आहे. भोसरी आणि सांगवी येथील नियोजित प्रत्येकी ४०० बेडच्या रुग्णालयांसाठी विद्युत व्यवस्था निर्माण करण्यास एक महिन्यांहून अधिक काळ लागणार हे उघड आहे. तोपर्यंत शहरातील कोरोना रुग्णसंख्या आता आहे त्यापेक्षा वाढेल का?, हे प्रशासनाने तपासून पाहिले पाहिजे.
एक महिन्यानंतर सुरू होणाऱ्या या दोन्ही नियोजित रुग्णालयांवर कोट्यवधी रुपये उधळून ठेकेदारांचेच भले करण्याचा प्रशासनाचा इरादा दिसत आहे. त्याऐवजी आताची वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्या प्रत्येकाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या मोठ्या मिळकतींमध्ये कमीत कमी खर्चात कोविड रुग्णालये सुरू करता येणे सहज शक्य आहे. त्यामध्ये महापालिकेच्या शाळांचा प्रशासनाने जरूर विचार करावा. याशिवाय शहरात अनेक मोठी मंगल कार्यालये आणि महाविद्यालये सुद्धा आहेत. तेथे चांगल्या प्रकारची विद्युत व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्याही उपलब्ध आहेत. याठिकाणी कोविड केअर सेंटरर्स सुरू केल्यास तेथे महापालिकेला विद्युत व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपये निश्चितच खर्च करावे लागणार नाहीत.
त्याचप्रमाणे नंतर बंद करण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या उभारण्यासाठीही कोट्यवधींचा वेगळा खर्च करावा लागणार नाही. फक्त बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून दिले की कोविड रुग्णालये सुरू होतील. भोसरी गावजत्रा आणि सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे कोविड रुग्णालये सुरू करण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करू नका. त्याऐवजी महापालिकेच्या मोठ्या मिळकती आणि मंगल कार्यालयात किंवा महाविद्यालयांमध्ये तातडीने कोविड रुग्णालये सुरू करून शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी. सध्या वाढणारी कोरोना रुग्णसंख्या विचारात घेता कोविड रुग्णालये तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे. एक महिन्यांनंतर भोसरी आणि सांगवीत सुरू होणाऱ्या जम्बो कोविड रुग्णालयांचा शहरातील कोरोना रुग्णांना फारसा फायदा होईल, असे दिसत नाही. माझ्या या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे.”