शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी (दि. 7 मे 2021) वाकड येथिल इंदिरा स्कूलच्या व्यवस्थापनाने मागील महिन्यात प्राथमिक वर्गातील 174 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करुन त्यांच्या पालकांच्या मागणीशिवाय व संमतीशिवाय दाखले दिले होते. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षण उपसंचालकांनी कायद्याचा बडगा उगारताच त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने पुनर्प्रवेश दिले.
लॉकडाऊनमुळे आर्थिकटंचाईने ग्रस्त असणा-या पालकांनी शालेय फी वेळेत भरली नाही, असे कारण शाळा व्यवस्थापनाने दिले होते. यातील काही पालकांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर वाकडकर यांनी इंदिरा स्कूल व्यवस्थापनाविरोधात शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करुन या विद्यार्थ्यांचे पुनर्प्रवेश करण्याची मागणी केली होती. शिक्षण उपसंचालकांनी मागील पंधरा दिवसात या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून व शालेय व्यवस्थापनाशी चर्चा करुन सर्व विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश दिले.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या कलम 16 (4) अंतर्गत, “शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेत मागे ठेवले जाणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही.” या कायदेशीर तरतुदीचा वापर करून दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी, शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे इंदिरा स्कुलवर कडक कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्राव्दारे केली होती.
यानंतर 23 एप्रिल 2021 रोजी शिक्षण उपसंचालकांनी इंदिरा स्कूल व्यवस्थापनास कायदेशीर नोटीस बजावली होती.
तसेच या विषयाचे गांभीर्य ओळखून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण अधिकारी यांना दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी इंदिरा स्कुलवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, मनपा शिक्षण अधिकारी जोस्ना शिंदे आणि मनपा प्राथमिक शिक्षण विभाग पर्यवेक्षक विलास पाटील यांनी योग्य ती कारवाई केल्याबद्धल विशाल वाकडकर आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
इंदिरा स्कूल व्यवस्थापनाप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील इतर कोणत्याही शाळा व्यवस्थापनाने पालकांना फी भरण्याविषयी तगादा लावल्यास किंवा ऑनलाईन शिक्षणाची सुविधा बंद केल्यास तसेच इतर कोणत्याही प्रकारे विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास दिल्यास पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसशी संपर्क साधावा. असेही आवाहन विशाल वाकडकर (9850999997) यांनी केले आहे.