पिंपरी : बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत मारूती शिंदे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. २०) रात्री निधन झाले. जयंत शिंदे हे गेल्या १० वर्षांपासून पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी काम करत होते. त्यांनी शेकडो बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपासमार होत असलेल्या बांधकाम कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्याचे काम शिंदे यांनी केले होते.
जयंत शिंदे यांच्या मागे मागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी मध्यरात्री शिंदे यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांना आकुर्डीतील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि दुपारी पाचच्या सुमारास त्यांची प्राण्यज्योत मालवली. शिंदे हे मूळचे अकोला तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे होते. त्यांच्यावर निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयंत शिंदे यांनी बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी २०१० मध्ये बांधकाम कामगार सेनेची स्थापना केली. या संघटनेचे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील १५ हजार बांधकाम कामगार सदस्य आहेत. त्यांनी दोन्ही शहरातील हजारो बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना सरकारी योजनांचे आर्थिक व इतर लाभ मिळवून दिले.
बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पुस्तक संच, शालेय साहित्य तसेच कामगारांना साहित्य खरेदीसाठी अनुदान, अपघाती मृत कामगाराच्या वारसाला बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून शासकीय मदत आदी अनेक योजनांचे लाभ त्यांनी कामगारांपर्यंत पोहचवले. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे बांधकाम कामगारांची उपासमार सुरू झाली. राज्य सरकारने या वंचित घटकाकडे दुर्लक्ष केले होते. जयंत शिंदे यांनी उपसमार सुरू असलेल्या बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. बांधकाम कामगारांसाठी त्यांनी घरातच बसून आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेत सरकारने बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी व कामगार नाक्यावर एकवेळचे मोफत जेवण सुरू केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जयंत शिंदे हे बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांचे पोट भरण्यासाठी प्रयत्नशील होते
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे