भाजपच्या वतीने सफाई कर्मचा-यांचा सन्मान
शबनम न्यूज / पिंपरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे देशात स्वच्छता, आरोग्याचे महत्व वाढले आहे. स्वच्छता कर्मचारी समाजाचे सदृढ आरोग्याचे खरे रक्षक आहेत. त्यांनी ते कोरोना संकट काळातही दाखवून दिले आहे, असे मत महापालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सात वर्षे पूर्ण झाले. त्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने निगडी प्राधिकरण येथे साफसफाई कर्मचा-यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी भाजपचे मंडलाध्यक्ष विजय शिनकर, अल्पसंख्यात मोर्चाचे अध्यक्ष सलीम सिकलगार, अ प्रभागाचे आरोग्य निरीक्षक बापू गायकवाड, अरुण थोरात, सचिन कुलकर्णी, मनोज देशमुख, प्रशांत बोरा, मयुर भिंगारे, नारायण पांडे, प्रसाद जोगळेकर, बशीर नदाफ आदी उपस्थित होते.
शर्मिला बाबर पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. घरोघरी, गावोगावी शौचालये उभारण्यात आले. स्वच्छता, आरोग्याचे आणि ते रोखण्यासाठी झटणा-या साफसफाई कर्मचा-यांचेही महत्व देशाला समजले आहे. मागील सात वर्षात केंद्र सरकारने विविध क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. शेतकरी, गरीब वर्गाला अनेक योजनांचे लाभ थेट मिळवून दिले. नुकतेच कोविड काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडातून त्यांचे पूर्ण पालकत्व स्विकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.