शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचा पाणीपुरवठा गुरुवार (दि. 29 जुलै) रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्रमांक 23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युतपुरवठा विषयक व पाणी पुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दिनांक 29 रोजी शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे देण्यात आली आहे.
दिनांक 29 जुलै रोजी मनपा मार्फत होणाऱ्या सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. 30 जुलै) रोजी होणाऱ्या सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी मनपा कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.