हा तर राजशिष्टाचाराचा भंग – तुषार हिंगे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ नोव्हेंबर ) :- महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे सावित्रीबाई फुले पुतळ्याची उभारणी व फुले सृष्टी आणि के.एस.बी. चौकातील छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळील फुले सृष्टीचे भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दि. २३) अधिकृतपणे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील तसेच त्यांच्या नंतरचा एकही वरिष्ठ अधिकारी किंवा जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. महानगरपालिका प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे प्रभाग १० चे भाजपचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी सांगितले.
नगरसेवक तुषार हिंगे म्हणाले की, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात फुले सृष्टी व शाहू सृष्टीचे भूमिपूजन झाले. त्यांनी महानगरपालिकेच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमास महापालिकेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आवर्जून उपस्थित होते. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त तसेच एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. हा राजशिष्टाचाराचा भंग आहे.
आयुक्तांच्या स्वाक्षरी नंतरच निमंत्रण पत्रिका अंतिम करण्यात आली. असे असतानाही ते कार्यक्रमास न आल्याबद्दल आश्चर्य वाटते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ऐकतात का? महानगरपालिकेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास त्यांना वेळ नाही का? असा प्रश्न नगरसेवक तुषार हिंगे यांनी उपस्थित केला आहे.
समजा, आयुक्त हे महत्त्वाच्या बैठकीत किंवा कामात व्यस्त होते, तर त्यांनी अतिरिक्त आयुक्त किंवा त्या दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कार्यक्रमस्थळी पाठविणे अत्यावश्यक होते. मात्र, महानगरपालिकेचा एकही जबाबदार अधिकारी कार्यक्रमास उपस्थित नव्हता. शहरात आलेल्या पाहुण्यांचे महापौरांपाठोपाठ आयुक्तांनी स्वागत करण्याची परंपरा व रिवाज आहे. मात्र आयुक्तांनीच कार्यक्रमाला दांडी मारल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्या प्रकाराबद्दल आम्ही आयुक्त राजेश पाटील यांचा निषेध करीत आहोत. असे नगरसेवक तुषार हिंगे यांनी स्पष्ट केले आहे.