शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०३ डिसेंबर) :- तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीत 70 हजार रुपये स्विकारताना महिला पोलीस उपनिरीक्षकासह सहायक पोलीस उपनिरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच सहायक पोलीस उपनिरीक्षक लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (वय- 28), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहे. सोळुंके आणि देसाई हे सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 42 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला असून या तक्रार अर्जाची चौकशी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके या करीत आहेत. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सोळुंके यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई याने तडजोडी करुन 70 हजार रुपये मागितले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. त्यावेळी सोळुंके यांच्या सांगण्यावर देसाई यांनी एक लाख रुपये लाच मागून तडजोडीत 70 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज गुरूवार तक्रारदार यांना 70 हजार रुपयांची रक्कम घेऊन पाठवण्यात आले. तक्रारदार यांच्याकडून देसाई याने लाच स्विकारली. ACB चे अधिकारी त्यांना पकडण्यासाठी गेले असता पथकातील अधिकारी यांना धक्का देऊन देसाई दुचाकीवरुन लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. तर महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक सीमा आडनाईक पोलीस निरीक्षक भरत साळुंखे सहायक पोलीस फौजदार शेख,पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस नाईक वैभव गिरीगोसावी, पोलीस शिपाई पूजा पागिरे यांच्या पथकाने केली.