शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात तसेच राज्यात कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या कोविड -१९ संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९ उपाय योजना नियम २०२० अंमलात आले आहेत. त्यानुसार कोविड -१९ चे प्रसारास प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरू असलेल्या आरोग्य व पर्यावरण रक्षणा करीता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती /व्यवसायिक विरुद्ध एकत्रित प्रतिबंधात्मक कारवाईसाठी महापालिकेकडून ग्रीन मार्शल भरारी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
ब क्षेत्रीय कार्यालयाकडील ग्रीन मार्शल भरारी पथकामध्ये आरोग्य निरीक्षक लिपिक आरोग्य सहाय्यक एम. एस. एफ. जवान यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथकाकडून दिनांक १० जानेवारी २०२२ ते दिनांक १२ जानेवारी २०२२ या कालावधीत मास्क न परिधान करणाऱ्या ५९ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रु. प्रमाणे २९ हजार ५०० रु. तसेच अस्वच्छता व प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केले बाबत एकूण १६ आस्थपणाविरुद्ध केलेल्या कारवाईत १२५० रुपये असे एकूण ३८ हजार २० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सागर कंट्री बार, पुणेरी मिळाइ मॉल, जिया चिकन सेंटर, जायका चहा, तुलसी सुपर मार्केट, बारामती ॲग्रो, हनुमान सुपर मार्केट, नॅशनल ट्रेडर्स , सुपर चिकन, गणेश पेंटर या व्यवसायिक आस्थापनांचा समावेश आहे.
यापुढे ही सदर कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी कोविड -१९ व स्वच्छता विषयक नियमांचे पालन करून शहरात कोविड -१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.