शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ फेब्रुवारी) :- सेवानिवृत्तीचे जीवन नव्याने वेगळ्या पध्दतीने जगण्याची संधी सेवानिवृत्तांना उद्यापासून प्राप्त होणार असून या संधीचा उपयोग सर्वांनी आनंदमयी जीवन जगण्यासाठी तसेच स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी करावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे जानेवारी २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या सुप्रिया सुरगुडे, गणेश भोसले तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जानेवारी २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये मुख्याध्यापक सुरेश बुधकर, सुनंदा बावीस्कर, ज्योती सातदिवे, लघुलेखक नलिनी चाबुकस्वार, लेखापाल सुधीर शिंदे, उपअभियंता धनंजय गवळी, कनिष्ठ अभियंता नवनीत मोरे, आरोग्य निरीक्षक मकरंद पानसे, आरोग्य सहाय्यक दशरथ बांबळे, मुकादम बापूराव खोत, माळी गोरक्षनाथ ताठे, रखवालदार रामचंद्र दाभाडे, शिपाई गिता परदेशी, मजूर दत्तात्रय साळुंके, सफाई कामगार सुनंदा मोरे, सफाई सेवक सफेदी वाल्मिकी, कचराकुली दिगंबर ब्राम्हणे यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार बबाबाई लोंढे, सफाई सेवक अनिल केदारी, संजीव वाघमारे, चंदा गोडावले, गटरकुली प्रकाश सौदा, कैलास गायकवाड, आप्पा तोरणे यांचा समावेश आहे.
महापौर माई ढोरे म्हणाल्या सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी उत्तम प्रकारे महानगरपालिकेची प्रदीर्घ सेवा केली आहे अशा अनुभवी आणि कर्तव्यदक्ष कर्मचा-यांची महापालिकेस सदैव उणीव भासत राहील असे सांगून त्यांनी सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील उत्तम आरोग्यासाठी तसेच आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.