शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे भाजप पक्षाचे माजी उपमहापौर , नगरसेवक केशव घोळवे यांनी मी निर्दोष आहे, माझ्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व मला बदनाम करण्याचा प्रकार झाला आहे. या घटनेचा मी स्वतः निषेध करत असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या पुढे घोळवे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, २०१७-१८ मध्ये अ प्रभाग अध्यक्ष असताना नेपाळी मार्केटचे काही प्रतिनिधी अ प्रभाग कार्यालयात निगडी प्राधिकरण येथे मला भेटण्यास आले व त्यांनी त्यांच्यावर होणारे अतिक्रमण कारवाईची कैफीयत माझ्यासमोर व्यक्त केली. मेट्रो प्रकल्पामुळे त्यांना विस्थापित केले जात आहे असे त्यांना सांगितले.
त्यानुसार मनपाचे तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून पुढे मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा केली व कारवाई स्थगित केली. मेट्रो स्टेशन साठी नेपाळी मार्केट ची जागा लागत आहे अशी मेट्रोने मागणी केली असता, तिथे त्या सर्वांना कायमचे विस्थापित करत होते. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याने महा मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा करून यांना सी एस आर अंतर्गत पक्के गाळे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला व ते पूर्ण झालेले आहेत. या मागचा मुख्य उद्देश हाच होता की, शहरांमध्ये हॉकर्सचे धोरण अवलंबलेले नाही यामुळे मुख्य रस्ते चौक अतिक्रमणाने बाधित झालेले आहेत. त्याचा रहदारीस त्रास होतो व अपघात होतात. त्याबाबत पुढे जाऊन मोठे काम करता यावे. मी शहरामध्ये २५ वर्षापासून कामगार क्षेत्रात, असंघटित, संघटित, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित घटकांचे प्रामाणिकपणे काम करीत आलेलो आहे. फक्त थरमॅक्स कंपनी पुरतेच काम केले नाही तर श्रमिक एकता महासंघाच्या सरचिटणीस या नात्याने जिल्ह्यातील १२५ हून अधिक कारखान्यांमध्ये काम केलेले आहे. अद्यापपर्यंत निष्कलंकच जीवन जगलेलो आहे. माझ्यावर खंडणी किंवा तत्सम एकही गंभीर आरोप झालेला नाही. परंतु दिनांक १ फेब्रुवारी रोजी चुकीच्या पद्धतीने केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझे चारित्र्यहनन करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. याचा मी तीव्र निषेध करत आहे. माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला व संपूर्ण महाराष्ट्रभर बातमी पसरली. ज्यांच्याबरोबर मी काम केलेले आहे त्या सर्वांना हळहळ वाटली व त्यांनी या घटनेचा खेदही व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, मी कोणालाही नेपाळी मार्केटमधील लोकांकडून कसलीही पैशाची मागणी केली नाही. धमकावणे तर खूप दुरान्वये आहे. या संपूर्ण षड्यंत्र मध्ये, पोलीस चौकशी मध्ये पूर्ण सहकार्य केलेले आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. मी निर्दोष आहे. माझ्या बाबत राजकीय षड्यंत्र वापरून शकुनी चाल केलेली आहे. परंतु या शहरातील तमाम गोर गरीब, कामगार गप्प बसणार नाही. ते निवडणुकीमध्ये ज्यांनी हे कटकारस्थान केलेले आहे त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे आयोजित पत्रकार परिषदेत घोळवे यांनी सांगितले.
परंतु त्यांच्या या दिलेल्या माहिती नंतर गुड्डू यादव व केशव घोळवे यांचा काय संबंध? या पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर केशव घोळवे यांना देता आले नाही, तसेच या प्रकरणात भाजप पक्षाचे पावत्या तक्रारदार यांना देण्यात आले या बाबत ही केशव घोळवे हे उत्तर देवू शकले नाही. पत्रकारांच्या अनेक प्रश्नाना बगल देत केशव घोळवे यांनी विरोधकांचा षडयंत्र असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर नानी घुले, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगर सेविका माधवी राजपुरे, ज्येष्ठ नगरसेविका झामाताई बारणे उपस्थित होते.
नगरसेवक केशव घोळवे यांना मागील १ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी नेपाळी मार्केट येथील व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या गुड्डू यादव यांनी केशव घोळवे यांचे नाव चौकशीदरम्यान घेतले होते. नेपाळी मार्केट येथील व्यापारी शेख यांनी याबाबत पिंपरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.