शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ एप्रिल) :- कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल मराठी कलाकारांना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध लेखक, पटकथाकार, उत्तम अभिनेते श्री.चिन्मय मांडलेकर यांंना देण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित गोरखे यांनी सांगितले. तसेच पुरस्कारानंतर प्रसिद्ध अभिनेते राहूल सोलापूरकर चिन्मय मांडलेकर यांची नाटक व चित्रपट सृष्टीतील प्रवासाविषयी प्रकट मुलाखत घेणार आहेत व पिंपरी – चिंंचवड शहरातील कला, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रातील ६ प्रतिभावान कलाकारांना ‘कलागौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे.
पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी दिनांक १६ एप्रिल २०२२ सकाळी ११ ते २ या वेळेत रामकृष्ण मोरे नाटयगृह, चिंंचवड येथे पार पडणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार, माजी शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिषजी शेलार यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
श्री. अमित गोरखे म्हणाले, ” कलारंग संस्था पिंपरी – चिंंचवड मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २२ वर्षांपासून कार्यरत आहे. मराठी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलागौरव’ पुरस्कार दिला जातो. मागील वर्षी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली होती.
आत्तापर्यंत सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, रिमा लागू, सुप्रिया पिळगांवकर, महेश कोठारे, अशा १५० पेक्षा जास्त कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यावह डॉ. प्रवीण दाबडघाव व पुणे विभाग कार्यावह श्री. मुकुंद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पिंपरी चिंंचवड मधील खालील कलाकारांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
१) आकाश थिटे – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, वॉईस ओवर आर्टिस्ट
२) रश्मी घाटपांडे – थिएटर आर्टिस्ट
३) तेजस चव्हाण – संगीतकार, संगीत संयोजक
४) निषाद सोनकांबळे – गायक
५) प्रगल्भ कोळेकर – अभिनेत्री
६) रविंद्र कांबळे – गायक
प्रसिद्ध लेखक, पटकथाकार, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांंना कलागौरव पुरस्कार तसेच त्यांची प्रकट मुलाखत
Advertisement