शबनम न्युज | पुणे
कोरोना साथीनंतरच्या काळात विविध करीयर संधींचा शोध घेऊन सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, महाराष्ट्र) च्या वतीने नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, इंडिया ‘ च्या सहकार्याने’ इन्स्पिरेशन 2022 ‘ ही राष्ट्रीय युवती परिषद दि.४-५ जून रोजी आळंदी येथे आयोजित करण्यात आली आहे.
चार आणि पाच जून रोजी आळंदीत धारिवाल सभागृह ( फ्रूटवाला धर्मशाळा , आळंदी देवाची)येथे ही परिषद होणार असून विविध राज्यातून दृष्टिहीन युवती उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( भारत )च्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुसुमलता मलिक, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( महाराष्ट्र ) प्रदेश सचिव दत्तात्रय जाधव आणि प्रवक्त्या सकीना बेदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे दुपारी साडेबारा वाजता ही पत्रकार परिषद झाली.
आळंदी येथे 4 जून रोजी जर्मनीतील सामाजिक समुपदेशक टिमोथस रुसेटी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता युवती परिषदेचे उद्घाटन होणार आहे .डॉ कुसुमलता मलिक उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. एसएफयू कॅनडाच्या परराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्ष सोभना जया माधवन यांचे बीजभाषण होणार आहे .डी पी जाधव, एल.एच. खापेकर ,सकीना बेदी हेही मार्गदर्शन करणार आहेत.
त्रिदेव खंडेलवाल हे ‘वित्त आणि सनदी लेखापाल ‘ क्षेत्रातील कारकीर्दीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
उद्योजकता विकासापुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात दानिश महाजन ( रेडिओ उडान ), संदीप मोरजकर (हॉटेलियर ), मेघना बेहेरे ( आयटी इंडस्ट्री ) मार्गदर्शन करणार आहेत. डॉ शंतनु लडकत हे परिसंवादाचे संचालन करतील. ‘ उच्च शिक्षणातील करिअर संधी ‘ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात टोनी कुरियन (आयआयटी मुंबई ), वैशाली दाबके (मॅक्सम्युलर भवन, पुणे ),रक्षित मलिक (संशोधक ) सहभागी होतील. दानिश महाजन संचालन करतील. ‘खेळ आणी मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी ‘ या कार्यशाळेत मिनीता पाटील ( माजी संचालक, बालकल्याण संस्था ) या मार्गदर्शन करतील. ‘ व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेतील कारकीर्दीच्या संधी ‘ या विषयावर नागराज मोरे,सदफ खान, प्रीतम सुंकवल्ली ,आरती ताकवणे मार्गदर्शन करतील .आदिती शहा (अमेरिका ) यांची दृकश्राव्य मुलाखत होईल.
या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जून रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .त्यात डॉ कुसुमलता मलिक मार्गदर्शन करतील. ‘ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी ‘ विषयावरील कार्यशाळेत श्रीनिवासु चक्रवरथुला मार्गदर्शन करतील. ‘ कार्पोरेट क्षेत्रातील वैविध्य आणि सहभाग ‘ या विषयावरील चर्चासत्रात नीरज कुमार, रजनी विनोद , डॉ.सोनम कापसे, सोभना जय माधवन सहभागी होतील. ‘कायदेशीर हक्क ‘ विषयावरील परिसंवादात डॉ.संजय जैन ,ऍड .जयना कोठारी, अंचल भतेजा, डॉ. जया सागडे सहभागी होतील. डॉ जया सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण परिषदेचा समारोप होईल.