शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजपच्या मिशन बारामती मुद्द्यावरून अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
पवार म्हणाले, महापालिकेची सावत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी गणेश मंडळांना भेटी देत नाही. आजही कोणालाही माहित नाही की निवडणुका कधी होतील, कधी आहेत? त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही बारामतीत भाजपचे स्वागत आहे. बघू बारामतीची जनता कोणाला कौल देते, असे उत्तर अजित पवार यांनी भाजपच्या मिशन बारामती वर दिले आहे.
आज अजित पवार पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळाच्या भेटीसाठी गुरुवारी शहरात आले. काळेवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या भेटीपासून दुपारी २ :३० च्या सुमारास त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. पुढे ते म्हणाले, दोन वर्ष कोरोनाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही. साधेपणाने सण साजरा करावे लागले. काल मुंबईतील महत्त्वाच्या काही गणेश मंडळांना भेटी दिल्या. आज दुपारपासून पिंपरी चिंचवड मधील मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यातून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात मंडळांनाही चांगले वाटते, मला पण एक समाधान मिळते. असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.