शबनम न्युज | मुंबई
खरी शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचल्यानंतर आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. शनिवारी ही मुदत संपल्यानंतर आयोगाने निर्णय होईपर्यंत तात्पुरतं शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे.आता सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पसंतीच्या ३ चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नव चिन्ह ठरल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या ३ चिन्हाची पसंती दिली आहे. त्यानुसार या तीन चिन्हापैकी कुठलं चिन्ह निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.हिंदू धर्माशी निगडीत उद्धव ठाकरेंनी हे ३ चिन्ह सुचवले आहेत. त्यात त्रिशूल हे भगवान शंकराचं शस्त्र आहे. उगवता सूर्य हा भगव्या प्रकाशात नवी पहाट आणण्याचं प्रतिक आहे. तर मशाल ही क्रांतीचं प्रतिक मानले जाते.