प्राधिकरणातील 150 नागरिकांनी घेतला लाभ
शबनम न्युज | पिंपरी
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्य हास्ययोग मंडळ व संत तुकाराम उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सलग पाचव्या वर्षी घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचा प्राधिकरणातील तब्बल 150 नागरिकांनी लाभ घेतला.
प्राधिकरणातील संत तुकाराम उद्यान सेक्टर 27 अ येथील सभागृहात रविवारी सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचा शुभारंभ पिंपरी-चिंचवडच्या माजी उपमहापौर तथा माजी नगरसेविका शैलजा मोरे यांच्या उपस्थितीत झाला. शिबिरात ईसीजी, रक्तातील रक्तशर्करा, हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, एसजीपीटी, क्रियेटीनीन, लघवी, अस्थीघनता चाचणी करण्यात आली. या शिबिराचा तब्बल 150 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार, भाजपाचे सलीम शिकलगार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चांदबी सय्यद, अशोक चोपडे, सासवडे, कुंदा कोळपकर, प्रदीप कांबळी, गुजराथी, साळुंके, संयोजक डॉ. गुणवंत चिखलीकर, तावसे ,डॉ म्हेत्रे आदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, अलिकडे दैनंदीन जीवन धकाधकीचे बनले आहे. आयुष्यात विरंगुळा घेण्यासाठी सुध्दा वेळ काढावा लागतो. या विदारक परिस्थितीमुळे मानसांचे आरोग्य संकटात आले आहे. त्यासाठी आरोग्य शिबिर घेणे काळाजी गरज असून यामुळे प्रत्येकाच्या शरिरात होणारे सकारात्मक व नकारात्मक बदल उजेडात येतात. वेळीच काळजी घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे सोयीचे होते. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे भविष्यात होणारा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे हे आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, अशा शब्दांत संयोजकांचे त्यांनी कौतुक केले.