शबनम न्युज | सांगवी
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना जीवनाचा आनंद मिळवून देणे यासाठी हा दीन साजरा केला जातो असे मत शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.त्यांनी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करून पालकांना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. पिंपरीच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा पिंपरी वाघेरे येथे समारंभाचे आयोजन केले होते.
त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील सी एस आर विभागाचे श्री विजय वावरे यांनीही पालकांना मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये कै. सौ.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर सांगवीच्या इयत्ता २री च्या पार्थ खोपटकर याला संगीत खुर्ची प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल गौरविण्यात आले . मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी त्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास पिंपरी विभागातील दहा केंद्रातील विविध शाळेतील 63 मुले व त्यांचे 147 पालक उपस्थित होते. जिल्हा समन्वयक श्री दत्तात्रय खुटवड* यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. सौ कविता ढोरे विशेषतज्ञ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी शहर साधन येथील विशेष शिक्षक श्री दत्ता गवळी, श्रीमती मंगल गायकवाड , विशेषतज्ञ व विषयतज्ञ यांनी केले.