अभिनेता रितेश देशमुख याचं पहिला दिग्दर्शन असलेलं ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. रितेश देशमुखचं पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला आहे. रितेश देशमुखनं अनेक मराठी व हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. व आपण एक उत्तम अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. अभिनेत्री जेनेलिया देशमुख ची मराठीतील एन्ट्री आणि अजय अतुल यांचं संगीत अशा बराच कारणांमुळे हा चित्रपट उत्कृष्ट ठरला आहे.
जेनेलिया आणि जिया शंकर या दोन्ही नाईकांसोबतची रितेशची अफलातून केमिस्ट्री सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला आहे. या चित्रपटात रितेश जेनेलिया यांच्यासोबत जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, खुशी हजारे, रविराज केंडे, विनीत शर्मा, विक्रम गायकवाड, अविनाश खेडेकर या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमपणे पार पाडल्या आहेत.
क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या खऱ्या प्रेमाची ही गोष्ट आहे. सत्या (रितेश), श्रावणी (जिनिलिया) यांचं लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे. बेकार असलेला सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का? याची उत्तरं १२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात. सत्याची अपूर्ण प्रेमकहाणी आणि श्रावणीची पूर्ण असूनही, अपूर्ण अशी प्रेम कहाणी असे कथानक असलेल्या ‘वेड’ ची कहाणी थ्रेटरमध्ये पाहण्यास मज्जा येईल. चित्रपटातील प्रत्येक अर्थपूर्ण दृश्य भावनिक करून जातो.
वेड हा चित्रपट ‘मजली’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. “प्रेम तूही केलंस आणि मीही… प्रेम तुझ्यातही आहे आणि माझ्यातही”….”ज्यांचं आपल्यावर प्रेमच नाही, त्यांच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला कळणार नाही”, असे अर्थपूर्ण संवाद चित्रपट संपल्यानंतरही मनात रुंजी घालतात. प्रेमाच्या लढाईत क्रिकेट आणि त्यातलं राजकारणही असलं तरी प्रेमावर फोकस करण्यात आला आहे. अजय -अतुल आणि गुरु ठाकूर यांनी कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणार गीत लेखन केलं असून, अजय-अतुलनं आपल्या अनोख्या शैलीत श्रवणीय संगीत दिलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली ही प्रेमकहाणी एकदा अवश्य पाहायला हवी.