राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळेच नाना काटे यांचा पराभव
रेहान हुसेन | संपादकीय
चिंचवड विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून, या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. तर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. या निवडणुकीमध्ये एकूण 28 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावले. प्रमुख तीन उमेदवार वगळता बाकी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल इतकी मते पडली.
सुरुवातीपासूनच चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीकरता भाजप वतीने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीनंतर महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी पक्षाचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडी वतीनेच इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु राहुल कलाटे यांनी कोणाचेही ऐकले नाही. खुद्द उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटे यांच्याशी संपर्क साधला व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. परंतु राहुल कलाटे यांनी उद्धव ठाकरे यांचा आदेश धुडकावत आपली उमेदवारी कायम ठेवली. राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पराभवाचा सामना करावा लागणार असे सुरुवातीपासूनच सांगण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडी वतीने सर्वच दिग्गज ज्येष्ठ नेत्यांनी नाना काटे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण चिंचवड मतदार संघ पिंजून काढला. प्रभावी प्रचार फेरी सभा, बैठका, कोपरासह अशा अनेक प्रचार यंत्रणा नाना काटे यांच्या प्रचारानिमित्ताने राबविण्यात आल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीवतीने प्रचंड प्रमाणात नाना काटे यांचा प्रचार करण्यात आला. त्यांच्या प्रचाराची तीव्रता पाहता चिंचवड विधानसभा मतदारसंघात विठ्ठल उर्फ नाना काटे हे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा पराभव करतील, असे वाटत असतानाच भाजप वतीने अश्विनी जगताप यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते सहभागी झाले. त्यांनीही संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचार केला. याचबरोबर अश्विनी जगताप यांना स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे मिळणारी सहानुभूती मोठ्या प्रमाणात मिळाली एक मत अश्विनी जगताप यांना स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगत भाजप वतीने मतदारांना भावना विवश केले गेले. त्याचा परिणाम असा झाला की अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मतदारांनी भरभरून मतदान केले.
तर राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी करत आपला उपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांनीही संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपला प्रचार मोठ्या प्रमाणात केला तसेच त्यांना वंचित बहुजन आघाडी वतिने पाठिंबाही मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल कलाटे यांच्यासाठी मोठी प्रचार सभा घेतली. त्यांची प्रचार सभा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना खेचणारी ठरली. परिणाम या निवडणुकीत राहुल कलाटे यांना 44,000 मते मिळाली. आता निकालानंतर असे सांगण्यात येत आहे की, जर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नसता, किंवा राहुल कलाटे यांनी माघार घेतली असती तर आज विठ्ठल उर्फ नाना काटे हे विजयी झाले असते. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळेच विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, राहुल कलाटे जर अपक्ष उमेदवार नसता तर राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे हे विजयी झाले असते.
राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना मिळालेली मते ही 99 हजार पेक्षा जास्त आहे व राहुल कलाटे यांना मिळालेली मते ही 44000 पेक्षा जास्त आहे. या दोघांच्या मतांची बेरीज केली तर स्पष्ट होते की, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळालेल्या मतांपेक्षा या दोघांची मतांची संख्या जास्त आहे. जर नाना काटे हे एकच उमेदवार अश्विनी जगताप यांचे विरोधात असते तर नक्कीच नाना काटे यांचा विजय झाला असता.