शबनम न्युज | अमरावती
रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केले.
कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत होते.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, जयंत डेहणकर, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.