शबनम न्युज | मुंबई
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राज्याचा ‘साडेतीन शक्तिपीठे : नारीशक्ती’ या चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तसेच राज्यगीताची संगीतमय निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सोहळा आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथाबरोबर नृत्य करणारे कलांवत, राज्यगीताचे कलांवत आणि महाराष्ट्र वाद्य गीत सादर करणारे गायक नंदेश उमप, गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, प्राची गडकरी, पंकज इंगळे, आनंदी जोशी, विशाल भांगे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.