शबनम न्युज | पिंपरी
कापड विक्री व्यावसायिकास खंडणी मागितल्याबद्दल तात्काळ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने एकास अटक केली आहे. ही घटना 8 फेब्रुवारी 2023 ते 14 मार्च 2023 दरम्यान घडली. या प्रकरणी कापड विक्री व्यवसायिकाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार माधव वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. तसेच आतिश शिरसाठ व त्याचे साथीदार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपरी मार्केटमध्ये रेडीमेड कापड विक्रीची दुकान असून, आरोपी यांनी फिर्यादी यांच्या दुकानात घुसून त्यांना शिवीगाळ करून ‘तुला कापड दुकान चालवायचे असेल, तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, हप्ता दिला नाही तर तुला दुकानासह जाळून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 500 रुपये खंडणी घेतली तसेच आतिष याने फिर्यादी यांच्या दुकानातील 1350 रुपये किमतीचे तीन शर्ट जबरदस्तीने घेऊन फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर आरोपींविरोधात भा.द.वि. कलम 386, 387, 392, 323, 504, 34, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहे.