शबनम न्युज | पुणे
एका मुलाखतीमध्ये मला त्यांनी 2024 ला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असे विचारले होते. त्यावर मी म्हणालो 2024 कशाला? आता जर माझ्याकडे बहुमत असेल, तर मला आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तुला काही त्रास आहे का? अशा मिश्किल शब्दात अजित पवार यांनी सवाल केला. बारामती येथे नेहमीप्रमाणे आढावा बैठकांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार रविवार (दि. २३) रोजी आले होते यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सहभाग घेण्याचा अधिकार आहे. संविधानाचे चौकटीत आपली मतमतांतरे प्रत्येकाने व्यक्त करावीत, मला जर कोणी चांगले म्हणत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय? असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच प्रत्येकाने चांगले काम करावे, कोणी काही बोलावे हा त्यांचा अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे. अवकाळी, गारपीट, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, सरकारी खरेदी केंद्र बंद झाले आहेत, ते विचारायचे दिले सोडून आणि हे असे का म्हणाले, ते तसे म्हणाले, सत्ताधारी त्यांच्या पक्षांतर्गत काय चर्चा करावी, हा प्रश्न त्यांचा आहे. त्यांचे मंत्री, पालकमंत्री काय बोलतात हा त्यांचा अधिकार. माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर याबाबत विचारणा केली तर ठीक आहे. असे महाराष्ट्रात अनेक जण काही वक्तव्य करणार आणि तुम्ही मला त्याबाबत विचारणार ‘तुमचं मत काय’ मला त्याबाबत काय घेणं-देणं आहे. असा सवाल पवार यांनी केला.