शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी – चिंचवड नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीतील धार्मिक स्थळे, मंदिरे, ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची सुविधा पीएमपीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पीएमपीतर्फे १ मे पासून पिंपरी चिंचवड दर्शन ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळे नागरिक, पर्यटकांना पाहण्याकरिता पिंपरी चिंचवड दर्शन ही बससेवा १ मे पासून सुरू करण्यात येत आहे. त्या पूर्वी ही बस सेवा ३ ऑगस्ट २०१९ पासून सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने तात्पुरत्या स्वरूपात ती स्थगित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मागणी होत असल्याने पीएमपीएमएलच्या वतीने सोमवारपासून (दि.१) ही सेवा वातानुकूलित बसद्वारे सुरू करण्यात येत आहे.
निगडीतून सुटेल बस
निगडी, भक्ती शक्ती येथून सकाळी ९ वाजता ही बस सुटेल. तर, भक्ती शक्ती उद्यान, प्रती शिर्डी शिरगांव, देहूगाव – मुख्य मंदिर, देहू गाथा मंदिर, बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, चापेकर बंधू स्मारक, श्री मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर / दुर्गा टेकडी ही स्थळे पाहता येणार आहेत.
तिकीट दर व वेळ
पिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे प्रति प्रवासी ५०० रुपये तिकिट दर आकारणी करण्यात येणार आहे. तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन या पास केंद्रावर उपलब्ध आहे. सदरील बस निगडी बस स्थानकावरून मार्गस्थ होणार आहेत. तसेच वेळे अभावी पर्यटन स्थळ / ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तर, वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७.१५ अशी राहील.