शबनम न्युज | मुंबई
राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी उपस्थित होते.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक झाली. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सर्वश्री सचिन कल्याण शेट्टी, सुभाष देशमुख, समाधान अवताडे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, रणजीत सिंह मोहिते पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालण्याचे काम करा. यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात अशावेळी घाट सुशोभीकरण, रस्ते दुरूस्ती तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान ५ कोटीवरून १० कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.