शबनम न्युज | पुणे
आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद सांधला असता, त्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, “तुम्ही काही काळजी करू नका. अतिशय व्यवस्थितपणे शरद पवार, जयंत पाटील, मी, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे आम्ही सर्व बसून योग्य मार्ग काढू.” असे पवार म्हणाले.
तसेच भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहोत, संस्कार झाले असतील, त्यानुसार ते बोलणार. पण वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती.” अशी भूमिका मांडत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले.