पिंपरी, :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये महिन्यातील दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दि. ११ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन आणि मुक्काम आहे. तर दि. १२ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. महापालिकेच्या बहुतेक अधिकारी कर्मचा-यांना पालखी सोहळा व्यवस्थापनाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
त्यामुळे सोमवार दि. १२ जून रोजी होणारी जनसंवाद सभा स्थगित करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या सभांचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार आहे. पुढील जनसंवाद सभा चौथ्या सोमवारी दि. २६ जून रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत होणार आहे. झालेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.