शबनम न्युज | नवी दिल्ली
महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार 2023’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून विकसित केली असून या अंतर्गत शासनाला लागत असलेल्या सेवा सामुग्रीचा पुरवठा जेमच्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना यामाध्यमातून मोठया प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला 5 ‘क्रेता-विक्रता गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
विविध पाच श्रेणीत राज्याने मारली बाजी
राज्याने सन 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून सिल्वर पुरस्काराचा मान मिळविला. स्टार्टअप – उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा दुसरा क्रमांक आलेला असून गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून सिल्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्याने तिसरा क्रमांक मिळवून सिल्वर पुरस्काराचा मानकरी ठरला. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केंद्रीय वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ या यावेळी उपस्थित होत्या.