पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी, ३ जून २०२३ – लाभार्थ्यांना आता हक्काचे स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमधील घराचा वापर स्वत: करावा. भाड्याने देऊ नये. इमारतीभोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने से. क्र. १७ व १९ चिखली येथील जागेवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना राबविण्यात येत आहे. सदरच्या योजनेमधील इमारत क्र. एफ-१७ या इमारतीचे लाभार्थ्यांना आज ताबा आदेश आणि किल्ल्यांचे वाटप अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, सामाजिक कार्यकर्ते युवराज कोकाटे तसेच इमारत अध्यक्ष सोमनाथ महाजन, उपाध्यक्ष गणेश सेंदाणे, सचिव दिपक मिरजकर, सहसचिव विठ्ठल भिसे, खजिनदार सिमा रोकडे, सल्लागार नामदेव देसाई आणि इमारतीमधील इतर लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त बोदडे यांनी मिळालेल्या घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. या इमारतीमध्ये सदनिका प्राप्त झालेल्या
लाभार्थ्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.