शबनम न्युज | मुंबई
“शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षी सुद्धा वाजत-गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार”, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आज मातोश्री येथे नंदीबैल घेऊन वासुदेवाच्या पोशाखात सेवेकरी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
मुंबईतील शिवाजी पार्क शिवतीर्थ येथे दरवर्षी उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होईल? यावर प्रश्नचिन्ह लागले होते. दोन्ही गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आले होते. दरम्यान, आता शिंदे गटांनी आपला अर्ज मागे घेऊन ठाकरे गटाचे मार्ग मोकळे केले आहे.
याप्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले, तुम्ही देवाची भक्ती करणारी माणसे आहात, वासुदेव आल्यानंतर दिवसाची सुरुवात सुंदर व्हायची, मुंबईतही पूर्वी वासुदेव यायचे, तेव्हा वाटायची सकाळ झाली, पण आता तुमची परंपरा राहिली काय आणि नाही राहिली काय, याचं कोणाला काहीही पडलेले नाही. पण खुर्ची कशी टिकेल यावर सगळ्यांचे लक्ष आहे. अनेक मंत्री आज नाराज आहेत. पण तुमच्यावर होणारा अन्याय पाहून एक तरी मंत्री नाराज झालाय का? अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. तसेच तुमचा पाठिंबा असाच कायम ठेवा, अशी विनंती ही त्यांनी सेवेकरांना केली आहे.