शबनम न्यूज , प्रतिनिधी :
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरात म्हाडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील सदनिकाधारक नागरिकांच्या अनेक तक्रारी मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या कडे येत होत्या.या अनुषंगाने म्हाडाच्या पुणे येथील कार्यालयात आमदार शेळके यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
या संदर्भात बैठकी मध्ये आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली , ‘म्हाडाच्या तळेगावमधील प्रकल्पाचे बांधकाम 2018 साली सुरु झाले होते.परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊन देखील प्रकल्प पूर्ण झाला नाही.यामुळे येथे सदनिका मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.प्रकल्पाला म्हाडाकडूनच विलंब झाला असून देखील यातील वाढीव रक्कम सदनिकाधारकांनी भरावी असा आग्रह म्हाडाकडून करण्यात येत होता.तसेच प्रत्यक्ष ताबा कधी देणार याबाबत अनिश्चितता होती.आज झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर A आणि D विंग मधील सदनिका 15 नोव्हेंबर पर्यंत ताब्यात देण्यात येतील आणि 15 डिसेंबरनंतर B आणि C विंग मधील नागरिकांना सदनिका ताब्यात देण्यात येतील,असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे .तसेच संबंधित सदनिकाधारकांनी वाढीव रक्कम भरु नये,असे हि सांगितले. आहे .
या बैठकीस आमदार सुनील शेळके , पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री.अशोक पाटील, कार्यकारी अभियंता श्री.महेश दातार, उपअभियंता श्री.प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक श्री.अतुल खोडे, उपअभियंता श्री.संजय नाईक, म्हाडाचे सदनिकाधारक नागरिक आदी.उपस्थित होते.