शबनम न्युज | पुणे
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अर्थात आयआयएचएमतर्फे आयोजित यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४ ची पहिली फेरी संस्थेच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत दहा देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला. आयआयएचएमच्या पुणे कॅम्पसमध्ये झालेल्या या फेरीत इटली, फ्रान्स, नॉर्दर्न आयर्लंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, स्पेन, वेल्स, स्लोव्हेनिया आणि अझरबैजान येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या दहाव्या यंग शेफ ऑलिम्पियाडमध्ये ६० हून अधिक देशांतील विद्यार्थी शेफनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत शाश्वतता आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टांप्रती (एसडीजीएस) बांधिलकी यावर भर दिला जात आहे.
पुण्यात पार पडलेल्या पहिल्या फेरीत सहभागी स्पर्धकांनी जगभरातील काही नामांकित शेफ आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दिग्गजांच्या परीक्षक मंडळासमोर तीन तासांहून अधिक काळात आपले पाककौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांना आयर्लंड येथील स्मार्ट ग्रुप लि.चे कार्यकारी पेस्ट्री शेफ साराह हार्टनेट, दक्षिण आफ्रिकेतील माउंट नेल्सन हॉटेलचे कार्यकारी शेफ गार्थ स्ट्रोबेल, लंडनमधील डोर्चेस्टर हॉटेलचे कार्यकारी शेफ मारियो परेरा, स्कॉटलंडचे नॅशनल शेफ व यूकेचे मास्टर शेफ, फूड ॲम्बेसेडर, लेखक गॅरी मॅक्लीन, सिंगापूरच्या मिशेलिन स्टारचे भारतीय एक्झिक्युटिव्ह शेफ मंजुनाथ मुरल आणि लंडनमधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेजच्या हॉस्पिटॅलिटी आणि पाककला विभागाचे प्रमुख शेफ पॉल जर्विस अशा दिग्गज परीक्षकांचा समावेश असलेल्या पॅनेलसमोर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांचे दोन टप्प्यांवर मूल्यमापन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात कौशल्य चाचणीचा समावेश होता, तर दुसरा टप्पा स्वयंपाकातील कौशल्य चाचणीचा होता. कौशल्य चाचणीमध्ये, विद्यार्थ्यांची भाजी किंवा अन्य आवश्यक पदार्थ कापणे, चिरणे यातील कुशलतेची चाचणी घेण्यात आली, तर स्वयंपाक चाचणीमध्ये पदार्थांची चव आणि सादरीकरण यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना एक मिष्टान्न (डेझर्ट) आणि चार टप्प्यांचा समावेश असलेले शाकाहारी भोजन भाग ब्रेझरी रेस्टॉरंट शैलीत देण्यास सांगितले गेले.
आयआयएचएम, पुणेचे संचालक आणि यंग शेफ ऑलिम्पियाड २०२४च्या कार्यकारी समितीचे सदस्य रुपिंदर सिंग खुराना म्हणाले, “आज पुण्यातील आयआयएचएम कॅम्पसमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झालेली सळसळती ऊर्जा, उत्साह भारावून टाकणारा आहे. या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ आहे. विद्यार्थ्यांनी या उद्योगातील दिग्गज व्यक्तींसमोर त्यांच्या पाककलेचे उत्साहाने केलेले प्रदर्शन खरोखरच प्रेरणादायी आहे. परीक्षण मंडळाचे सदस्य, विविध देशांचे मार्गदर्शक आणि मुख्य परीक्षक यांनी सहभागी विद्यार्थांना दिलेला सतत पाठिंबा त्यांच्या नम्रतेची जाणीव करून देतो. या सगळ्या अनुभवाबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे. या फेरीनंतर आज हे विद्यार्थी पुण्याला निरोप देत आहेत आणि स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी कोलकता शहरात जात आहेत. पहिल्या फेरीनंतर, सर्व स्पर्धक आणि मार्गदर्शक स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी सांस्कृतिक शहर कोलकता येथे रवाना होतील. पहिल्या फेरीमधील आघाडीचे दहा स्पर्धक ग्रँड फायनलमध्ये भाग घेतील; तर ११ ते २०व्या
क्रमांकावर असलेले पुढील १० स्पर्धक प्लेट ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील आणि उर्वरित स्पर्धक यंग शेफ
ऑलिम्पियाड डॉ. सुबोर्नो बोस चॅलेंजमध्ये भाग घेतील.
ग्रँड फायनलचे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेते; प्लेट ट्रॉफी विजेता; डॉ. सुबोर्नो बोस चॅलेंज विजेते आणि इतर सर्व पुरस्कार विजेत्यांची चार फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी समारोप समारंभात घोषणा केली जाईल. सुवर्ण विजेत्याला पाच हजार डॉलरची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर रौप्य विजेत्याला ३००० डॉलर आणि कांस्य विजेत्याला २००० डॉलरचे बक्षीस दिले जाईल.