शबनम न्युज :प्रतिनिधी
पुणे : संसदीय कायद्यांतर्गत स्थापित दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वतीने डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स’ (सीएमए) इंटरमिजिएट व फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुण्यातील सहा विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत (एआयआर) आले आहेत.
इंटरमिजिएटमध्ये २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार सानिका नाईकने २१ वे आणि ऋषिकेश साळुंके याने ५० वे, तर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार आकाश धामोळे याने ४५ वे स्थान पटकविले. २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या फायनल परीक्षेत शब्बीर वकील याने ३६ वे, मनमोहन काबरा याने ४७ वे, तर विशाल झांबरे याने ५० वे स्थान पटकविले. पुणे परीक्षा केंद्रामध्ये २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या १०६१ विद्यार्थ्यांपैकी १०१, तर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या ९८५ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार फायनल परीक्षेला बसलेल्या ५५९ विद्यार्थ्यांपैकी ३५, तर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार फायनल परीक्षेला बसलेल्या १४८ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘आयसीएमएआय’ केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, ‘आयसीएमएआय’ पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, उपाध्यक्ष सीएमए नीलेश केकाण, सचिव सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, खजिनदार सीएमए राहुल चिंचोलकर, कोचिंग कमिटी चेअरमन सीएमए हिमांशू दवे, स्टुडंट कॉर्डीनेशन कमिटी चेअरमन सीएमए अमेय टिकले यांनी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसह सीएमए परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
‘सीएमए’ची परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे यश आहे. अतिशय कठीण स्वरूपाची ही परीक्षा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, पश्चिम विभागातून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पुणे परीक्षा केंद्रातून सर्वात जास्त आहे तसेच ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येत्या ९ मार्च २०२४ रोजी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.