पिंपरी (दि. 7 मे 2021) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीए मध्ये विलिनीकरण करण्याच्या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गटनेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राव्दारे सचिन साठे यांनी हि मागणी केली आहे.
या पत्रात सचिन साठे यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपुर्वी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांनी देखील प्राधिकरणाचे पीएमआरडीए मध्ये विलिनीकरण करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी देखिल पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर येथिल भुमीपुत्रांच्या जमिनी आरक्षित करुन ताब्यात घेण्यात आल्या. त्यातील अनेक शेतक-यांना अद्यापही साडेबारा टक्याचा परतावा दिलेला नाही. पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात प्राधिकरणाचा मोठा वाटा आहे. प्राधिकरणाच्या नियम व अटींमुळेच या परिसराचा विकास सुनियोजित झाला आहे. येथिल भुमीपुत्रांच्या त्यागावर आणि श्रमिकांच्या कष्टावर हे वैभवशाली शहर उभे राहिले आहे. या शहरातील नागरीकांनी दिलेल्या करातून बचत करुनच प्राधिकरणाने ठेवी जमा केल्या आहेत. या रकमेचा विनीयोग येथिल नागरीकांच्या सुख – सुविधा व विकास प्रकल्पांसाठी झाला पाहिजे, अशी शहरवासियांची मागणी आहे.
पीएमआरडीए या संस्थेकडे पुणे व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्राच्या बाहेरील तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रांबाहेरील कार्यक्षेत्र आहे. एवढ्या विस्तिर्ण परिसराचा विकास आराखडा तयार करणे, त्याच्यावर आक्षेप, सुनावणी घेणे आणि त्यासाठी निधी उभा करुन विकास प्रकल्प उभारणे यासाठी पुढे किती वर्षे लागतील याबाबत साशंकता आहे. पीएमआरडीएकडे निधी नसल्यामुळे प्राधिकरणाच्या बचतीतून जमा झालेल्या ठेवी वापरल्या जातील. याबाबत शहरवासियांमध्ये नाराजी आहे. हा निर्णय येथिल भुमिपुत्रांवर आणि कष्टक-यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे प्राधिकरण विलिनीकरणाच्या निर्णयाचा महाविकास आघाडी सरकारने फेरविचार करावा अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.