शबनम न्युज / पुणे
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत कंबर कसली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. पुराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच शेजारच्या राज्यांशीही चर्चा सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीदेखील बैठका घेतल्या जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१९ साली पश्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीसाठी धावले होते. मदतकार्य करताना जाणवलेल्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच सज्ज केली आहे.