चिखली (प्रतिनिधी)
: कुप्रसिद्ध गुंड आणि मयत माथाडी कामगार नेता प्रकाश चव्हाण याच्या वाढदिवसानिमित्त पूर्णानगर येथे एकनाथ मोहिते याच्या नेतृत्वाखाली माथाडी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळाची जंगी तयारी करण्यात आली होती. या तयारीने पुन्हा उदयोग जगताक खळबळ माजली. आधिच अनेक संकटाने कंपन्या मेटकुटीला आल्या आसताना चव्हाण टोळीच्या या एकजूटीच्या प्रयत्नामुळे मालक-चालक लोकांना एका वेगळयाच संकटाला तोंड देण्याची भिती निर्माण झाली आहे. तर पोलिस प्रशासनापुढे देखील शांतता सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हाण उभे राहिले आहे.
प्रकाश चव्हाण याच्या वाढदिवसाचे निमीत्त साधत चव्हाण टोळीने महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनिअन संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली होती. त्या पार्श्वभुमीवर पुर्णानगर येथे माथाडी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता. पण हा कार्यक्रम चिखली पोलीसांनी उधळुन लावला आहे. वाढदिवसाच्या निमीत्ताने सैरभैर व विस्कळीत गॅंग पुन्हा या कार्यक्रमाच्या निमीत्ताने गोळा करण्याचा डाव होता. पण पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश सिंह यांचे या हालचालीवर बारीक नजर असल्याने त्यांनी यंत्रणेला कडक आदेश देऊन कायदेशीर कारवाई केली आहे. यामुळे चव्हाण टोळीचा पुढील प्रवासावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
पोलीसांनी बजावलेल्या नोटिसीला न जुमानता हा कार्यक्रम पार पाडण्याचा त्यांचा डाव होता. कोणत्याही दबावाला न जुमानता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या सूचनानुसार चिखली पोलीसांनी हि कारवाई केल्याने माथाडीच्या नावाखाली गुंडागर्दी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पूर्णा नगर चिखली येथील आर.टी.ओ जवळील शॉप नं. 2 मध्ये माथाडी कामगार यांचे कार्यालय सुरु करण्याचे प्रयोजन या टोळीने केले होते. गुंड प्रकाश चव्हाण याचा साथीदार असलेला व खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगुन आलेला एकनाथ अर्जुन मोहिते (मामा) याने या टोळीचे सुत्र हाती घेतली आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी संघटनेचे अध्यक्ष पदी त्याची निवड झालेली आहे. तर या संघटनेच्या उपाध्यक्ष पदी प्रकाश चव्हाण याचा मुलगा प्रद्युम चव्हाण याची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार (ता.4) रोजी प्रकाश चव्हाण याचा वाढदिवस असल्याने या संघटनेच्या कार्यालय सुरु करण्याचा या टोळीचा मानस होता. मात्र, पोलीसांनी हा डाव उधळुन कार्यक्रम रद्द केला असल्याचे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी सांगितले आहे.
प्रकाश चव्हाण हा सातारा, फलटण भागात दरोडा टाकण्याचे काम करीत होता. नंतर त्याने स्वतःची टोळी स्थापन केली. खून, खूनाचा प्रयत्न हप्ते वसुली अशा स्वरुपाची विविध गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. राजकिय वरदहस्त लाभल्याने माथाडी कामगार नेता हे पद देखील त्याला मिळाले होते. पिंपरी, चिंचवड, मावळ, चाकण, पिरंगुट या औद्योगिक परीसरात आपले हात पसरल्याने त्याचा या भागात चांगला दबदबा निर्माण झाला होता. मात्र, वर्चस्वाच्या प्रयत्नामध्ये त्याची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा त्यावेळी खुप रंगली होती.
एकनाथ मोहिते खंडणी गुन्ह्यात त्याला १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. मात्र, काही वर्षांनी पॅरलवर सुटल्यानंतर तो पोलीसांना गुंगारा देत फरार झाला होता. मात्र, वाकड येथे सापळा रचुन पोलीसांनी एकनाथ मोहिते याला ताब्यात घेतले होते. त्या बरोबरच पुणे जिल्हयातील लोणवळा, हिंजवडी, पुणे, शिरुर व खेड तालुक्यात देखील मोहिते यांच्यावर जबरी चोऱ्या खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस प्रशासनाच्या भयमुक्त अभियानावर देखील प्रश्न चिन्हः-
पिंपरी चिंचवड शहर गुन्हेगारी मुक्त आणि भयमुक्त होण्यास सुरवात झाली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर ज्या प्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे कृती करण्यास सुरवात केली आहे. आमदार पूत्रावर कारवाई नंतर आता माथाडी कामगार संघटनेच्या नावाने शहरात तसेच औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरवात झालेली आहे. नागरिकांनी भयमुक्त जीवन जगावे हि त्यांची अपेक्षा आहे.
फ्लेक्स वर सराईत गुन्हेगारांचे छायाचित्रः-
मोहिते याच्या निवडीचे फ्लेक्स संपुर्ण शहरात व औदयोगिक पट्टयाबरोबरच महामार्गाच्या कडेला असलेल्या होर्डींगवर देखील झळकत होते. या फ्लेक्सवर खुन, खुनी हल्ला, जबरी चोऱ्या, खंडणी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे छायाचित्र होते. त्यामुळे ही टोळी पुढील नियोजन बध्द कार्यक्रम हाती घेऊनच शहरात ब्रॅंडीग करत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाशसिंह आपल्या संकल्पनेतुन पिंपरी चिंचवड भयमुक्त करण्यासाठी धडपडत असताना अशा टोळ्या पुन्हा तयार होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचे अभियानावर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.