- लांडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आवाहन
- भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा विराट मोर्चा
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गेल्या साडे चार वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महापालिका लुटून खाल्ली आहे. महापालिका त्यांनी विकायला काढली आहे. तरी देखील त्यांना कमी पडत असून दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढतच आहे. शहरातील नागरिकांना हे शहर सोडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांनी आता भिण्याचे कारण नाही. राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या मजबुत नेत्याकडे आहे. ते शहरातील नागरिकांचे हे संकट दूर करतील. आगामी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह मित्र पक्षांचा झेंडा फडकणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच नगरसेवकांनी आपले राजीनामे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देऊन महापालिकेतील लुटारू सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्याचे आवाहन लांडे यांनी केले. तसेच महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्याचे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जागरण गोंधळ घालत आंदोलन केले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले. त्यानंतर महापालिकेवर विराट मोर्चा आयोजित करण्यात आला. या वेळी माजी आमदार विलास लांडे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली.
निषेध मोर्चाला शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका वैशाली घोडेकर, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, विराज लांडे, स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे, भाउसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष यश साने, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात स्वर्गीय अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराची धुरा योग्यरीत्या सांभाळली. निरपेक्षपणाने त्यांनी शहराचा विकास केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातून मोठा निधी शहराच्या विकासासाठी आणला. शहरातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर, घरकुल, प्रशस्त रस्ते आदीसह विविध मोठे प्रकल्प आणले. मात्र गेल्या साडेचार वर्षात शहराच्या विकासाला उतरती कळा लागली आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिका विकायला काढली आहे. त्यामुळे ती रसातळाला गेली आहे. वाढता भ्रष्टाचार पाहता शहरातील नागरिकांना हे शहर सोडावे लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांनी आता घाबरण्याचे कारण नाही. राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या मजबूत नेत्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात शहराची धुरा ते आपल्या खांद्यावर घेऊन नागरिकांची ही भीती नक्कीच दूर करतील, असे प्रतिपादन लांडे यांनी केले. महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडण्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे शहराची इभ्रत वेशीवर टांगण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असल्याची खरमरीत टीका माजी आमदार लांडे यांनी केली.
लांडे पुढे म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या लुटारूपणाचा निषेध करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामे देणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करावी. याबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून महापालिका बरखास्त करून महापालिकेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्याचे आवाहन लांडे यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केली. सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात भविष्यातही एकीने लढा देण्याचे काम करण्याचे आवाहन या वेळी लांडे यांनी केले.
भविष्यात मुख्यमंत्री पदावर अजित पवारच –
सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष असून भविष्यात मुख्यमंत्री या पदावर अजित पवार हेच विराजमान होणार असल्याचे प्रतिपादन लांडे यांनी केले. महापालिकेतही सत्ता बदल होऊन पुन्हा आपलेच नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे महापालिकेतही लुटारू सत्ताधारी उलथवून राष्ट्रवादीचा झेंडा मोठ्या डौलात फडकवू असे प्रतिपादन या वेळी माजी आमदार लांडे यांनी केले.