शबनम न्यूज : पुणे (दि.१९ डिसेंबर) :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन केलं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण शाह यांनी आज केलं. त्यानंतर बोलताना शाह यांनी पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही पुणेकरांना दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पुणे दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिले. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 110 कोटीचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही,असे ते म्हणाले.