मा. उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांची मागणी,आकुर्डी रेल्वे स्थानक प्रमुखांना दिले निवेदन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवडमधील रेल्वे कर्मचारी व रिटायर्ड रेल्वे कर्मचारी यांना डिजिटल पास (ई-पास) वापरणे गैरसोईचे होत आहे. मुळात ज्येष्ठ नागरिकांना अँड्रॉईड फोन उपलब्ध होईलच असे नाही. जरी उपलब्ध झालाच तरी ते वापरणे अत्यंत क्लिष्टदायक आहे. तरी, डिजिटील पास वापरण्यावर ताबडतोप तोडगा काढून पेपर पास पध्दतीचा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आकुर्डी रेल्वे स्थानक प्रमुखांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे कर्मचारी व निवृत्त रेल्वे कर्मचा-यांना डिजिटल पास (ई-पास) वापरणे सक्तीचे केले आहे. मुळात रेल्वेच्या निवृत्त ज्येष्ठ कर्मचा-यांना अँड्रॉईड फोन वापरणे अत्यंत क्लिष्ट होत आहे. किंबहुना त्यांच्याजवळ तसा फोन उपलब्ध असेलच असे नाही. तथापि, पेपर पास (पेपर प्रिव्हलेज पास) करिता संबंधित निवृत्त कर्मचा-यांचे रेकॉर्ड शोधून ते व्हेरिफाय करण्यासाठी यंत्रणेला होणारा त्रास टाळण्यासाठी डीजीटल पास सक्तीचे केले जात आहे. ही पध्दत पेन्शनरला अत्यंत किचकट होत आहे.
विशेष म्हणजे डिजिटल पास (ई-पास) मधून केलेले एखादे रिजर्वेशन काही कारणास्तव रद्द केल्यास पासचा कार्यकाळ शिल्लक असुनसुध्दा तो आपोआप रद्द होतो. किंवा तो पास वैध दाखवत नाही. असा कटू अनुभव डिजिटल पेन्शनर्सला सतत येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून रेल्वे कर्मचारी व रिटायर्ड रेल्वे कर्मचारी यांना डिजिटल पास (ई-पास) वापरणे अत्यंत गैरसोईचे होत आहे. तरी ताबडतोप यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर तथा नगरसेविका मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.