शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, डुडुळगाव या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना, संयुक्त,सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पाककला स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात कु. विशाखा म्हसदकर, वैष्णवी पांचाळ व तेजस्विनी चव्हाण यांच्या स्वागत गीत, दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सौ. उज्वला शिवाजी ठाकरे, सौ संगीता नरेश दरवरकर हाउस कीपिंग महिला, श्री वैभव बडवे व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय प्रा.सिमा साळुंके यांनी करून दिला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.शितल पाटील प्राचार्या- आदित्य इंग्लिश स्कूल यांनी जागतिक महिला दिन या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना स्त्रीचे कुटुंबातील स्थान, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा शिक्षणाचा वसा आणि वारसा जपण्याची गरज तसेच आधुनिक काळात महिलांसाठी शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करीत केवळ शिक्षणामुळेच स्त्रीचा उत्कर्ष होतो आणि शिक्षणामुळेच विविध शाखेतील नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात असे मत विविध उदाहरणासह व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी जागतिक महिला दिन म्हणजे स्त्रीशक्तीला वंदन व यशोगाथा गाण्याचा दिवस होय तसेच बौद्धिक चातुर्य, माया, सुसंस्कार, कर्तत्वशील व कार्यकुशलता हे गुण स्त्रीमध्ये उपजत असतात असे मत व्यक्त करीत संस्थेचे ब्रीद वाक्य ‘ महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण’ आजच्या दिवशी किती महत्त्वपूर्ण आहे, तसेच जगातील महिला आहे म्हणून पुरुष आहे यासंदर्भात विवेचन करीत महर्षी कर्वे, रानडे व महात्मा फुले यांनी स्त्रियांचा जसा सन्मान केला तशा सन्मानाची आज गरज असून आधुनिक काळातील स्त्रीने समाजकारण,राजकारण, उद्योग, कला व संस्कृती या क्षेत्रात कशी गरुड झेप घेतली आहे हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी मा. श्री.मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. छाया जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन कु. शितल काकडे यांनी केले आणि उपस्थितांचे आभार प्रा. सोनाली अभंग यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रा. शैला वाळुंज, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके,प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.करिष्मा सातपुते, प्रा. दिपाली सोनवणे, सौ वर्षा ताजणे, प्रा.मीरा केसकर प्रा. रेखा सुतार, प्रा. विमल गायकवाड, प्रा.हिमानी पडळसेकर, प्रा. मयुरी वर्पे आणि प्रा.प्रिती चोरडे आणि महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.