शबनम न्यूज : तळेगाव स्टेशन (दि.१५ मार्च) :- शुक्रवार, दिनांक १८ मार्च २०२२ पासून तळेगाव स्टेशन येथील राजगुरव कॉलनीतील गणेश मंदिर प्रांगणात श्री गणेश प्रतिष्ठानने तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये शुक्रवार, दिनांक १८ मार्च २०२२ रोजी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रा. गणेश शिंदे प्रथम पुष्प गुंफणार असून उद्योजक अशोक काळोखे अध्यक्षपदी असतील. शनिवार, दिनांक १९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी ‘प्रश्न आजचे… उत्तर संतसाहित्याचे’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफणार असून नगरसेवक गणेश काकडे अध्यक्षस्थान भूषवतील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प एकपात्री कलाकार विश्वास पटवर्धन हे ‘स्वभाव राशींचे’ या विषयावर गुंफणार असून नगरसेवक निखिल भगत आणि युवा उद्योजक चिराग खांडगे यांची त्या प्रसंगी विशेष उपस्थिती राहील.
दररोज सायंकाळी ठीक सहा वाजता सुरू होणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार असून महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ शाखाध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची प्रमुख उपस्थिती राहील. विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी आणि सचिव दिलीप राजगुरव यांनी केले आहे.