माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांची माहिती
शबनम न्युज | पिंपरी
केंद्र सरकारकडून कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांसाठी जाहिर करण्यात आलेली ५० हजार रुपये इतकी आर्थीक मदत संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ६ हजार ८७६ कुटुंबांना ही मदत मिळाली असून कोविड १९ आजारामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला केंद्र सरकारने आधार दिला आहे, अशी माहिती माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्र शासनाकडून ही मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच, सदर मदतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले होते. त्यानुसार, प्राप्त अर्जांची छानणी करून कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आथिर्क मदत देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदर प्रक्रीयेची माहिती घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून केंद्र सरकारचे पथक पुणे जिल्हयात दाखल झाले आहे.
मदतीस पात्र कुटुंबियांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. अर्जदाराचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाण पत्र (पीडीएफ, जेपीजी), अर्जदाराचा आधार संलग्न बॅंक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी), आणि रुग्णालयाचा तपशिल आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोविड १९ चे निदान झाले असे कागदपत्र (पीडीएफ, जेपीजी), तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणा पत्राची तपासणी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पथकाकडून करण्यात आली आहे.
अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येत आहे. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ५० हजार रुपयांची सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील सर्व साधारण सभेत ठराव मंजूर करून कोविड १९ आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या विधवा पत्नीला २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने अशा घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदतीद्वारे दिलासा मिळाला असून नामदेव ढाके यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.