शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि. ११ जून रोजी संपन्न होणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणा-या या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित असणार आहेत.
बोपखेल येथे स्टेशन हेडक्वार्टर खडकी ५१२ आर्मी बेस कॅम्प वर्कशॉप खाडी ते बोपखेल बाजू दरम्यान बांधण्यात येत असलेल्या पुलाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार सकाळी सहा वाजता करणार आहेत. यानंतर मोरवाडी पिंपरी येथील फिनोलेक्स चौकात उभारण्यात आलेल्या लाल घोडा शिल्पाचे, वाय जंक्शन वाकड येथे उभारण्यात आलेल्या चित्ता शिल्पाचे, शहीद अशोक कामटे उद्यानासमोरील जागेत उभारण्यात येणारे हत्ती शिल्पाचे आणि पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात उभारण्यात आलेल्या ‘रिंग ऑफ लाईफ’ या शिल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात येईल.
त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाला भेट देणार असून या ठिकाणी समाज विकास विभागाच्या योजना, उपक्रम आणि ऑनलाईन प्रणालीचे सादरीकरण, बांधकाम परवानगी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीचे सादरीकरण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या कामकाजाचे आणि नव्याने करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सादरीकरण, व्हॅाट्सअॅप चॅटबोटबाबतचे सादरीकरण पाहणार आहेत. सकाळी ७ वाजता, महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चिंचवड येथील आटोक्लस्टर समोरील तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार करणार आहेत. तसेच येथील शिल्प वर्कशॉपला देखील भेट देणार आहेत.
यानंतर लांडेवाडी भोसरी येथे उभारण्यात आलेल्या समाज भवनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच आळंदी रोड भोसरी येथे नियोजित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडाविहाराचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर सकाळी ८ वाजता महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे उभारण्यात आलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलामध्ये स्केटिंग ट्रॅक बनविण्यात आले असून १७५ मी. च्या तीन लेन तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंगावर प्रेरणादाई म्युरल्स रेखाटण्यात आले आहेत.
सकाळी ९.३५ वाजता, महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या थेरगाव रुग्णालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डायलेसिस, एन.आय.सी.यु. युनिटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रुग्णालयाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार करणार आहेत.