शबनम न्युज | सातारा
प्रतिनिधी | दिलीप सोनकांबळे
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा मारुन तिचा खून केल्याप्रकरणी दिलीप वामन पवार (वय 62, रा. मतकर कॉलनी, शाहूपुरी) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलीप पवार याला अटक केली आहे.
शाहूपुरीतील मतकर कॉलनीत रंजना दिलीप पवार (वय 62) या पती दिलीप आणि इतर कुटुंबीयांसमवेत राहण्यास होत्या. दिलीप पवार चारित्र्याच्या संशयावरुन रंजना यांना वारंवार मारहाण करत असतं. याच कारणावरुन गुरुवारी दुपारी त्यांच्यात वाद झाला. वादानंतर दिलीप पवारने घरात असणारा दगडी पाटा रंजना यांच्या डोक्यात मारला. रंजना गंभीर जखमी झाल्या व रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. पवार यांच्या घरातील भांडणे तसेच आरडाओरडा ऐकून इतर त्याठिकाणी जमले.
जमलेल्यांनी तसेच इतर कुटुंबीयांनी रंजना यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असताना रंजना यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलीप पवार याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत प्रदीप दिलीप पवार (रा. मतकर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या.