शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
“आज महाराष्ट्रात येऊन हजार कोटींचा प्रकल्प देऊ सांगत आहेत, म्हणजे तुम्हाला अडीच लाख कोटींचा फॉक्सकॉन आणि आम्हाला पॉपकॉर्न द्या”, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रबोधन शिबीरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग गुजरातला जाण्यावरूही मोदी सरकारला लक्ष केलं. जामीन मिळू नये म्हणून ईडी लावायची आणि लोकांना अडकून ठेवायचं. ईडीचा धाक दाखवून कुटुंब उद्धवस्त करायची, एवढंच काम सध्या देशात सुरू आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.
“ईडीचा धाक दाखवून कुटुंब उद्धवस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही आजारी आहेत. अनिल देशमुखांना ईडीच्या केसमध्ये जामीन मिळाला आहे, तरी सुद्धा त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन मिळू नये म्हणून ईडी लावायची आणि लोकांना अडकून ठेवायचं, एवढंच काम सध्या देशात सुरू आहे”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
तसेच आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार राहावे लागणार आहे. राज्यातील महापालिका किंवा जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधीही घोषित होतील. त्यामुळे जर शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर निवडणुकींच्या माध्यमातून त्यांना बळ द्या,” असे खास आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.