संपादकीय | रेहान हुसेन
पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ व कसबा पेठ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाने सर्व राजकीय पक्ष यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप व कसबा विधान सभा मतदारसंघाच्या आमदार स्वर्गीय मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.
या निवडणूकीसाठी ३१ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ७ फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यास पक्षांना वीस दिवसांचा अवधी मिळणर आहे. मतदान २७ फेब्रुवारीला होणार असून निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे.
या निवडणुकीत भाजप कोणता उमेदवार देणार ? याची चर्चा आता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात रंगली आहे. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे निधनानंतर त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांना भाजप वतीने उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. गत निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या जागेवर निवडणूक झाल्यास राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे यांचे नाव सध्यातरी पुढे येताना दिसत आहे. भाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याचा दाट अंदाज आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा बिनविरोध होतो की निवडणूक घ्यावी लागेल हे आता लवकरच कळणार आहे. महाविकास आघाडी वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरिता उमेदवार देण्यात येणार की नाही हे अजूनही स्पष्ट झाले नसले तरी चिंचवड विधानसभा मतदार संघात माजी नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे ,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत.
यांच्यापैकी माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी 2023 च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना संपूर्ण शहरभर शुभेच्छा फलकावर आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे संकेत दिले होते याची बातमी शबनम न्यूज वृत्तसंस्थे ने सर्व प्रथम दिली होती तसेच मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती त्यांना महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा पाठिंबा होता. यावेळी त्यांना एक लाख बारा हजार मते मिळाली होती राहुल कलाटे हेही या पोटनिवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असतील यावेळी हे महत्त्वाचे ठरेल की महाविकास आघाडी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आपला कोणता उमेदवार देते किंवा उमेदवार देणार नाही.
आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या आमदाराचे निधन झाले त्या आमदाराच्या घरातील व्यक्तींना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येते व त्या उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्ष कोणताही आपला उमेदवार देत नाही व ही पोटनिवडणूक बिनविरोध होत असते परंतु मागील काही वर्षापासून आपण पाहिले तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघ, कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ, मुंबईतील अंधेरी पोटनिवडणूक या निवडणुकांमध्ये ज्या घरातील आमदारांचे निधन झाले त्यांच्या विरोधात पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवार देऊन निवडणूक लढविण्यात आली. यावेळी भाजपने महाराष्ट्राची परंपरा तोडली आता या कसबा विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आपली कोणती भूमिका मांडते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे .आपण पाहिले तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप किंवा भाऊंच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळू शकते आणि जर महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास महाविकास आघाडी वतीने माजी नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्यात येऊ शकते की महाविकास आघाडी आपल्या महाराष्ट्रातील परंपरा कायम ठेवत ही निवडणूक बिनविरोध करण्यास पुढाकार घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाचा आमदार कोण? हा आगामी येणारा काळ लवकरच ठरवेल दोन मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या पक्षाचा उमेदवारच चिंचवड विधानसभेच्या आमदार होणार आहे किंवा निवडणूक बिनविरोध झाल्यास जगताप कुटुंबातील व्यक्ती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील.