कलाटेंच्या बंडखोरीला बळी पडू नये – आमदार सुनील शेळके
शबनम न्युज | चिंचवड
“राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर मुंबईतून, शिवसेना भवनातून कारवाई पुढील दोन दिवसात करण्यात येईल,” असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिले. तसेच शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असेही अहिर यांनी सांगितले. आज पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.
अहिर म्हणाले, “महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे नगरसेवक पद नाही, शिवाय ते सध्या शिवसेनेचे गटनेतेही नाहीत, त्यामुळे पद काढून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नाही. मात्र, निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर मुंबईतून पुढील दोन दिवसात कारवाई करण्यात येईल.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले, “राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी, म्हणून आम्ही देखील प्रयत्न करत होतो. मात्र, आता वेळ गेली असून, त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे कोणीही त्यांच्या बंडखोरीला बळी पडू नये, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे नाना काटे सोबत ठामपणे उभे राहतील.” असे शेळके म्हणाले.