रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेत केला भाजपचा पराभव
शबनम न्यूज | पुणे
कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची मतमोजणी करण्यात आली. या निकालामध्ये कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेत विजय मिळविला आहे. त्यांना एकूण 72,599 मध्ये मिळाली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 61,771 मते मिळाली.
रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळविला आहे. तर त्यांच्या विरोधात असलेले हेमंत रासने यांना पराभव स्वीकारावा लागला. रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली होती. पहिल्या फेरीपासून 20 व्या फेरी पर्यंत धंगेकर हे आघाडीवर होते. त्यांनी आपली आघाडी कायम ठेवत मोठ्या प्रमाणात विजय मिळविला. पंधराव्या फेरीनंतर धंगेकर यांचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर कसब्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू झाला होता.
कसबा मतदार संघाच्या स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकी करिता भाजप वतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने या जागेवर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करताच भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडी वतीने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. 27 फेब्रुवारी रोजी या जागेसाठी मतदान पार पडले. त्यानंतर कसबा मध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार यांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवीत कसब्यावर विजय मिळविला.