शबनम न्युज | पुणे
सत्ताधारी उन्मत्त झाले, लोकशाही मूल्य जपत नसतील तर त्याना वठणीवर आणण्याची ताकद पत्रकार,लेखक, कलावंत यांच्यामध्ये आहे. त्यासाठी वाचनाची चळवळ सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वाचन चळवळीला गती देण्यासाठी मंत्रालयासमोर नरिमन पाँईट, मुंबई येथे वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज व डिजिटल माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव या विषयावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ सिसिलिया कार्व्हालो, राज्य ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळुतात्या यादव, माळशिरसचे आदर्श सरपंच महादेव बोरावके, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, सुनील यादव, चंद्रकांत बोरावके, सर्जेराव यादव, मोहन यादव , यु एफ. जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यादव म्हणाले कि, वाचन चळवळ सक्षम झाली तर समाज समृध्द होतो. वारकरी संप्रदायाचा विचार संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांनी तळा गाळात पोहचवला.त्यामुळे सक्षम विचारांचा मावळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या कामी आला. वाचनातून आत्मविश्वास निर्माण होतो, लढण्याची प्रेरणा मिळते. सत्ताधारी चुकीचे वागत असेल तर त्यांना वठणीवर आणायचे काम पत्रकार, कवी, लेखक, कलावंत, बुद्धी जीवी वर्ग करू शकतो, त्यांना वाचनातून लढण्याचे बळ मिळते, परदेशी लेखक थॉमस पेन यांचे कॉमन सेन्स पुस्तकातून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनी समतेची क्रांती केली, जगभरात क्रांती घडवून आणण्याचे काम पुस्तकांनी केले आहे. वाचन चळवळचा लढा राज्यभर नेण्यासाठी आम्ही पालखीचे भोई होऊ, त्याचे संयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाऩने करावे, युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून परिवर्तन घडवून आणणारी छोटी पुस्तके प्रकाशित करावीत,असे ही श्री यादव यांनी सांगितले.
डॉ सिसिलिया कार्व्हालो म्हणाल्या, वाचन केले तर समाज समृद्ध होत असतो. वाचनाची गोडी मुलांना लावण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले पाहिजे. जगातील क्रांती पुस्तकामुळे झाल्या आहेत.
काकड म्हणाले, सरकार गावात सार्वजनिक ग्रंथालय सक्षम करण्यासाठी काम करत आहे, ग्रंथालय डीजिटल करण्याचा प्रयत्न करत आहे, पुस्तकांची युवा पिढीला गोडी लागावी यासाठी पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबविण्यात आली आहे, राज्यात ११ हजार ग्रंथालयांना अनुदान दिले जाते. वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज असून, डिजिटल माध्यमाचा वाचनावर प्रभाव पडला आहे. वाचन संस्कृतीचे महत्व व विकास युवा पिढीत रुजविण्याची गरज आहे. असे श्री काकड यानी सांगितले.
चर्चासत्रात रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ सिद्धी जगदाळे, साहित्यिक किरण येले यांनी उत्तरे दिली.
एकदिवसीय परिसंवादाचे निमंत्रक खासदार सौ सुप्रियाताई सुळे होत्या. संयोजन ग्रंथालय संसाधन व ज्ञानोपासक अनिल पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, सरचिटणीस हेमंत टकले यांनी केले होते.