शबनम न्यूज | नवी दिल्ली
ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया ’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील परिसरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.