हनुमान मित्र मंडळाच्या शिष्टमंडळाकडून घाटाची पाहणी..
उत्तर भारतीय बांधवानी मोठ्या प्रमाणात उत्सवात सहभागी व्हावे – आयोजक विजय गुप्ता…
पिंपरी (दि. १६) :- उत्तर भारतीय बांधवांच्या चार दिवसीय छ्ठ पूजा उत्सवास उद्या शुक्रवार (दि. १७) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था व इतर आवश्यक बाबी पुरवाव्यात, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती.
त्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिंचवडगावातील पवना नदीवरील घाटास प्रत्यक्ष भेट देत कामांचा आढावा घेतला. त्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत, सहायक अधिकारी शिंदे, छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, शशिकांत श्रीवास्तव, जे जे गुप्ता, मुन्ना गुप्ता, दुर्लमप्रसाद गुप्ता, मदनरमई प्रसाद गुप्ता, मनीष लक्ष्मण गुप्ता आदी उपस्थित होते.
छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून उत्तर भारतीय बांधव वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान श्री सूर्यषष्ठी महाव्रत २०२३ या अंतर्गत सुर्यषष्ठी महाव्रतास आरंभ होणार असून शुक्रवारी (दि. १७) रोजी स्नान ध्यान, शनिवारी (दि. १८) रोजी रसियाव रोटी (छोट की छठ), रविवारी (दि. १९) सूर्य षष्ठी व्रत, संध्या अर्घ आणि सोमवारी (दि. २०) रोजी पारण, प्रातः अर्ध असे चार दिवस विधीपूर्वक मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पवना नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती, पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विजय गुप्ता यांनी केले आहे.